
अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात...; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा
माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची मोहीम राबवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याला धक्का देत नगराध्यक्ष पदासाठी एबी फॉर्म दिला आणि थेट राजकीय समीकरणे बदलली. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांना अर्ज भरू देऊ न देण्याची घटना घडली, ज्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिस बंदोबस्तात त्यांनी अखेर अर्ज दाखल केला परंतु थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला आणि निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली.
बिनविरोध निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीत राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात एकेरी, अवमानकारक पातळीवरील टीका केली. त्यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये रोष उसळला असून, स्थानिक पातळीवर वातावरण तापले आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अजित यांच्या छत्रछायेत वाढलेले लोक आज त्यांच्यावर टीका करत आहेत, ही कृतघ्नता आणि राजकीय अज्ञानाची पराकाष्ठा आहे. बाळवीरांनी जरा आपलं स्थान आणि कर्तृत्व पाहावं.” “दादांच्या नखाची सर सुद्धा ज्यांना नाही, त्यांनी मोठमोठ्या गोष्टी करू नयेत. अजितदादांवर टीका करून चर्चेत येण्याचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र ओळखतो.” “मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. स्वतःची राजकीय ओळख निर्माण न होणाऱ्या लोकांनी अजितदादांवर टीका करण्याचे धाडस करू नये.”
अनगर नगरपंचायत बिनविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद आता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्या तणावाकडे ढकलणार, अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. बाळराजे पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झाली असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
पिता- पुत्रांची जाहीर माफी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आधी माजी आमदार राजन पाटील यांनी तर त्यानंतर बाळराजे पाटिल यांनी जाहीर माफी मागितली आहे. राजन पाटील म्हणाले, भावनेच्या भरात बाळराजेंकडून न कळत काही अपशब्द गेलेत. ते अजिबात समर्थनार्थ नाहीत. अजितदादांनी पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावे. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो. असे म्हणत बाळराजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
तर अजित दादांना चॅलेज देण्याइतका मी मोठा नाही. पण अजितदादांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करत आहेत. उमेश पाटील यांना माझे कार्यकर्तेच उत्तर देतील. अजीत दादांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे बाळराजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.