उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ
Rajan Salvi Shiv Sena UBT : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटासाठी धक्क्यांची मालिका सुरू झाली आहे. कोकणातील विश्वासू नेता राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याचदरम्यान पुणे शहराचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्षाला रामराम ठोकला. विशाल धनवडे यांच्यानंतर माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप न केल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, राजन साळवी यांना त्यांच्या कुटुंबासाठी पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. त्यामुळे महिनाभरात राजन साळवी याबाबत निर्णय घेणार आहेत. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी बहुमताने राजापुरात विजय मिळवला आहे. तर किरण सामंत यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024 च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
तर दुसरीकडे पुणे शहरातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे सांगणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, सप्रेम जय महाराष्ट्र,आजच्या या पत्रास कारण की या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झालाय. मागील एक महिन्यापासून झोप नाही, बीपीची गोळी सुरु आहे. परंतु आता निर्णय झाला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे म्हणतात तसं एकदा निर्णय घेतला की घेतला परत मागे नाही फिरायचे नाही, तसे झाले आहे. मी कधी माझ्या स्वप्नात ही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल. ज्या शिवसेनेवर मी एवढं प्रेम केलं, ती वाढवण्यासाठी एवढे कष्ट घेतले. ज्या शिवसेनेने मला एवढे प्रेम दिले, नाव दिले, मोठे केले ती शिवसेना सोडताना खूप त्रास होत आहे. माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय, असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली आहे. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकद द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही.