फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड – मोखाडा : मुंबई नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा कसारा घाटातून मार्गस्थ होणारा राष्ट्रीय महामार्ग मोखाडा तालुक्यातून मुंबई कडे प्रस्तान करणाऱ्या शेकडो वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी मागील पाच वर्षात असंख्य अपघात घडले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने जरूर ती उपाय योजना करण्याची मागणी मोखाडा तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.
मुंबई नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग हा कसारा घाटातून जाणारा एकेरी महामार्ग आहे या मार्गांवरून मोखाडा, खोडाळा येथून ठाणे, मुंबई येथे कार्यालयीन व दवाखाण्याच्या कामासाठी जाणाऱ्या खाजगी व परिवहन महामंडळाच्या प्रवाशी वाहनांसाठी (विहीगाव) जव्हार फाटा ते लतीफवाडी पर्यंतचा चार किलोमीटरचा मार्ग हा अत्यंत धोकादायक झालेला आहे. मुंबईकडून येणारी वाहनेही सदरचा मार्ग हा एकेरी असल्याने भरधाव वेगाने मार्गक्रमन करतात. त्यातच मुंबईकडून नाशिककडे प्रयाण करणारी अवजड वाहनेही शेजारून जाणाऱ्या वाहनांना वळसा घालून पुढे त्याच वेगाने जात असल्याने विहिगाव फाट्यावरून कसाऱ्याकडे (समोरून) धावणारी वाहनेही जात असल्याने त्या वाहणांना मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी घडणाऱ्या घटना घडत आलेल्या आहेत. पर्यायाने याठिकाणी पर्यायी उपाय योजना करण्याची निकड असताना देखील संबंधित विभाग त्याकडे सोईस्करपने दुर्लक्ष करीत आहे.
“दुभाजक टाकण्याची मागणी”
(विहिगाव )जव्हार फाटा ते लतीफवाडी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गांवर मोखाडा खोडाळा येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्ता दुभाजक टाकल्यास सदरील वाहणांना सोईचे होणार असून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकते. रस्ता दुभाजकाला तितकासा खर्चही येणार नसल्याने या पर्यायी व्यवस्थेचा तातडीने विचार करून अवलंब करण्याची मागणी प्रवाशी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ठाणे यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.
“सूचना फलकांचा बागुलबुवा “
मुंबई नाशिक राष्ट्रीय दृतगती महामार्गावर लतीफवाडी ते जव्हारफाटा दरम्यान ठिकठिकाणी “समोरून मुंबई कडे जाणारी वाहने येत असल्याने वाहने हळू चालवा”असे मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आलेले आहेत.मात्र मुंबईकडून येणाऱ्या वाहनांकडून कोणतीही अंमल बजावणी होताना दिसत नाही.उलटपक्षी मुंबईकडून येणारी वाहने प्रस्तुत सूचना फलकांकडे सोईस्करपने डोळेझाक करून पुढे जात असल्याने हे मार्गदर्शक सूचना फलक केवळ बागुलबुवा ठरलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील त्याबाबत खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.