रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला देणार भेट; पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार (फोटो सौजन्य - pinterest)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून अजूनही राजकीय वातावरण तापले आहे. 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये अनेक मतभेद सुरु आहेत. एकमेंकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.
हेदेखील वाचा- कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांच्या हाडांच्या आजारात वाढ
रामदास आठवले उद्या 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता राजकोट किल्ल्याला भेट देऊन दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे कळताच रामदास आठवले यांनी या दुर्घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी देखील केली होती. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील रामदास आठवले आणि त्यांच्या पक्षातर्फे करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना अत्यंत भीषण आहे. या घटनामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र राज्य सरकारने या घटनेतून धडा घ्यावा आणि अधिक सुरक्षेची काळजी घेऊन नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील त्याच ठिकाणी उभारला पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता रामदास आठवले राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत आणि पुतळा कोसळलेल्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत.
हेदेखील वाचा- Breaking: मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. या घटनेनंतर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले. विरोधक आंदोलन करत आहेत. लवकरच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी या दुर्घटनेबाबत मोदींनी जनतेची माफी मागितली आहे. आज मी माझे पूज्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मस्तक टेकवून माफी मागतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या माफीनाम्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात पंतप्रधान थेट माफी मागू शकले असते पण त्यांनी सशर्त माफी मागितली आहे. माफी मागून फायदा होणार नाही. जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.