कर्नाटकातील रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; मोठ्या ब्रँडच्या नावाखाली विक्री
कुरुंदवाड/सुरेश कांबळे : कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेसाठी शासनाकडून मोफत वितरित होणारा रेशन तांदूळ आता काळ्या बाजारात सापडला आहे. हा तांदूळ ट्रकच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून गणेशवाडी मार्गे अब्दुललाट व इचलकरंजीपर्यंत येतो आणि येथे बेकायदेशीर प्रक्रिया करून बाजारात मोठ्या ब्रँडच्या नावाखाली विक्रीसाठी पाठवला असल्याची चर्चा गणेशवाडीपासून इचलकरंजीपर्यंत सुरू आहे.
या रॅकेटची शृंखला इतकी कौशल्याने विणली गेली आहे की, ‘अली बाबा चाळीस चाेर’सारखी याची कहाणी आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात हा चर्चेचा विषय बनली आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या एका गावात या रॅकेटचा श्री गणेशा सुरू झाला आहे. कर्नाटक शासनाकडून गरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ काही ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने राज्याबाहेर पाठवला जातो. अब्दुललाट व इचलकरंजी येथील मिलमध्ये या तांदळावर रंगीबेरंगी लेबल लावून, सुगंधी सेंट मारून आणि पॅकिंग करून तो ‘ब्रँडेड’ तांदळाच्या स्वरूपात बाजारात आणला जातो. परिणामी सामान्य ग्राहकाला तो उच्च दर्जाचा तांदूळ वाटतो आणि तोही अधिक किंमतीत विकला जातो.
या संपूर्ण प्रक्रियेमागे आर्थिक फायद्याचा मोठा खेळ असून, शासनाच्या योजनेतील तांदूळ गरीबांच्या थाळीऐवजी व्यापाऱ्यांच्या कोठारात पोहोचत आहे. पुरवठा विभाग आणि अन्न-औषध प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे, अशी जनतेत चर्चा सुरू आहे.
कृत्रिम चमक व गोड सुगंध
या तांदळाची ओळख कशी करायची, हा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. रेशन तांदळाचा रंग आणि सुगंध थोडासा वेगळा असतो, तर बाजारात विकल्या जाणाऱ्या या ‘प्रक्रिया’ केलेल्या तांदळाला कृत्रिम चमक व गोड सुगंध असतो. तरीही त्यातील फरक सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. आणि याचाच गैरफायदा हे लोक घेत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा
स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा काळाबाजाराचा वास मारणारा तांदूळ प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा ठरेल, अशी लोकांमध्ये चर्चा रंगली आहे.