
कोकणातील 'या' गावात 1492 सालापासून 'ही' अनोखी परंपरा सुरु!
गुहागर तालुक्यातील उमराठ–हेदवी गावची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा देवदिवाळीनिमित्त बगाडा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या पारंपरिक उत्सवाला यंदाही राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक उपस्थित होते.
या बगाडा सोहळ्यात मंदिरासमोर उभारलेल्या 20 फूट उंच लाकडी खांबावर 40 फूट लांबीची ‘लाट’ गोलाकार फिरवली जाते. शिवकालीन पद्धतीची ही पारंपरिक रचना असून लाटेच्या दोन्ही टोकांना काकरांदीच्या वेली बांधल्या जातात. शेकडो वर्षांपूर्वी पासून चालत आलेल्या या प्रथेनुसार गावातील मानकरी नवस फेडण्यासाठी त्यांच्या पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे (Hooks) टोचून घेतात आणि देवीच्या जयघोषात त्या लाटेवर स्वार होतात. विशेष म्हणजे, या विधीत भक्तांना कोणतीही इजा होत नाही. हेच या उत्सवाचे अनोखे वैशिष्ट्य आहे.
Ahilyanagar News: कर आकारणीवर निलेश लंके यांचा आक्षेप, थेट मनपा आयुक्तांना पाठवले पत्र
परंपरेनुसार मानाचा आकडा हेदवी येथील राऊत कुटुंबाला देण्यात येतो. यावर्षी मानाचा आकडा सौरभ सुभाष गावणंग (डागवाडी) यांनी घेऊन 5 फेऱ्या पूर्ण केल्या. तर नवसाचा आकडा सचिन सखाराम गावणंग (उमराठ धारवाडी) यांनी 7 फेऱ्या पूर्ण केल्या. तसेच सुभाष सोनू गावणंग (डागवाडी) यांनाही आकडा टोचण्यात आला. ‘मुखामध्ये आकडे टूपले, नवस पावले’ असा घोष करत भक्तांनी घंटानादासह लाटेची प्रदक्षिणा पूर्ण केली.
आकडा टोचण्याचा मान पूर्वीपासून अनंत राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला मिळतो. गावातील दामोदर बाळू आंबेकर, अनंत पांडुरंग गावणंग, रूपा गुणाजी आंबेकर (आंबेकर वाडी) आणि कै. सोनू महादेव गावणंग यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून आकडा बांधणी आणि लाटेची तयारी केली जाते. ग्रामस्थांच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया श्रद्धा, नवस आणि देवीवरील अढळ विश्वास यांवर आधारित आहे.
ब्रिटिश काळापासून अनेकांनी ‘देवीच्या साक्षात्काराला’ आव्हान दिले; परंतु श्रद्धा अनुभवून ते सुद्धा देवीचे भक्तच बनले, असा अनुभव गावकऱ्यांनी सांगितला. नवस पूर्ण करण्यासाठी आकडा टोचणारे भक्त सूर्योदयापासून ते विधी पूर्ण होईपर्यंत उपवास करतात व तोंडातील थुंकीही न गिळण्याची कठोर प्रथा पाळतात.
जुन्या दस्तऐवजांनुसार सन 1492 मध्ये शांतोजी सर्जेराव पवार यांनी या गावाची आणि परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. गुहागर–चिपळूण मार्गावरील मोडका आगरपासून जवळ असलेले उमराठ–हेदवी गाव, वेळणेश्वर, साखरी आगर आदी पर्यटन स्थळांच्या सान्निध्यात असल्यामुळे या गावाच्या परंपरांना सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.