"पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात क्रांती, शरद पवारांनी उधळली स्तुतीसुमने"; विशिष्ठी डेअरीच्या कृषीमहोत्सावाला उदंड प्रतिसाद
चिपळूण (प्रतिनिधी):– शहरात वशिष्ठ डेअरीकडून कृषी महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना शेतीची प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करता यावा तसंच शेतीविषय आणि दुग्धव्यवसाया संबंधित या कृषी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान या महोत्सावाल शरद पवार आणि इतर राजकीय मंडळींनी देखील भेट दिली आहे. वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव अतिशय आनंददायी असून शेतकऱ्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय. पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात ते जे काम करीत आहेत, ती एक प्रकारची क्रांती आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या प्रशांत यादव यांना दापोली कृषी विद्यापीठ व तुम्हा सर्वांची साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करतांना वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी वर्गांचे कौतुक केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२५ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
.यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल? या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले.
यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तर ते आणखी पुढे म्हणाले की, शेतीसाठी पाणी नियोजनाची गरज आहे. तसेच उत्तम बी- बियाणे असली पाहिजेत. तसेच शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा केला पाहिजे. तरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, असे पवार यांनी यावेळी सांगताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील वाटचाल कौतुकास्पद असून शरद पवार यांनी कृषी महोत्सवासाठी मोठी जागा घेऊन स्टॉलच्या बाजूला नवीन भात बी-बियाणांच्या जातीची पेरणी करून ते पीक कसे येते? याची माहिती शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी अधिक जोमाने कृषी क्षेत्रात काम करेल, असा सल्ला दिला. कोकणात मत्स्य, कृषी पशु, दुग्ध क्षेत्रात मोठी संधी आहे. कोकणचा चेहरा मोहरा बदलतोय तो आणखी बदलेल आणि कोकणचा भाग संपन्न होईल. या भागाचा नावलौकिक होईल असा विश्वास व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने या दृष्टीने आणखी पावले टाकावीत, असा सल्ला दिला.
तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, साधारण निवडणुका झाल्या की नेत्याची थांबण्याची मानसिकता असते. मात्र, प्रशांत यादव यांनी दुप्पट जोमाने कार्य सुरू केले आहे. त्यांनी उत्तम वाशिष्ठी दूध संस्था त्यांनी उभारली आहे. कृषी महोत्सवाद्वारे कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, समृद्ध पशुधन शेतकऱ्यांना पाहता आले. त्यासोबतच बचत गटातील भगिनींना व्यासपीठ मिळवून देत न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कृषी महोत्सवाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतीचा मार्ग अवलंबवावा असे आवाहन केले.
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले की, कोकणातील शेतकरी समाधानी आहे. पण पवार साहेब आपण जे बोललात त्यातील पशुसंवर्धन बाजुला केलेलं आहे. जर त्यामध्ये पशुसंवर्धन पडलं तर कोकणाचा विकास निश्चित आहे. विद्यापिठाच्या तंत्रज्ञानातून शेतकरी संपत्तीवान होतील, याची खात्री देत नाही. पण समाधानी आणि यशस्वी शेतकरी तयार करू, याची खात्री देत असल्याचे सांगीतले.या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविकात प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीचा आढावा घेताना पशुसंवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे सांगितले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.