
दर ६ महिन्यांत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया
अधिकच्या पडताळणीमधून घटना आली उघडकीस
प्रमाणपत्रांबाबत शंका आल्याने नियुक्ती रोखली
रत्नागिरी: पोस्टाच्या भरतीत बोगस प्रमाणपत्र बनवून ती खरी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रत्नागिरी मुख्य डाकघर कार्यालयात सन २०२३ मध्ये घडला असून, याप्रकरणी लातूर व नांदेड येथील दोघांवर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रत्नागिरी पोस्ट कार्यालयातील सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश श्रीपाद कुलकर्णी (वय ३८, रा. खारेघाट रोड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनंत मारोती शेळके (२२, रा. कोकणगा, लातूर) व लंकोश नामदेव राठोड (२५, रा. शिरढोण, ता. कंधार, नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. संशयित दोघांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था, नोएडा यांचे बोगस प्रमाणपत्र बनविली होती.
दर ६ महिन्यांत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया
या प्रमाणपत्रांचा वापर त्यांनी पोस्टाच्या भरतीत केला होता. मात्र, हा प्रकार आता निदर्शनास येताच सहाय्यक डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी बोगस प्रमाणपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीनंतर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दहावीचे बोगस प्रमाणपत्रसंपूर्ण महाराष्ट्रात दर सहा महिन्यांनी पोस्टात शाखा डाकपाल, डाक वितरक, डाकसेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन होते. दहावीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाते. सन २०२३ मध्ये झालेल्या भरतीत दोघांनी दहावीचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे पुढे आले आहे.
अधिकच्या पडताळणीमधून घटना आली उघडकीस
भरतीसाठी दोघांनी ऑनलाइन जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना दहावीच्या प्रमाणपत्राची माहिती संबंधित बोर्डाच्या संकेतस्थळावर मिळाली नाही. त्यामुळे ही प्रमाणपत्रे संबंधित बोर्डाकडे पाठविण्यात आली. त्यावेळी बोर्डाकडून ही प्रमाणपत्रे आमच्याकडील नसल्याचे सांगण्यात आले. अधिक पडताळणी केल्यानंतर ही प्रमाणपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
मोठी बातमी! खेर्डी हादरली; MIDC मधील ‘या’ प्रसिद्ध कंपनीला भीषण आग
प्रमाणपत्रांबाबत शंका आल्याने नियुक्ती रोखली
दोघांनी जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची भरती प्रक्रियेत निवडही करण्यात आली होती. चिपळूण व दापोली येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पडताळणीदरम्यान प्रमाणपत्रांबाबत शंका आल्याने त्यांची नियुक्ती रोखण्यात आली.