
महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई (Photo Credit - X)
चिपळूण (वार्ताहर): महानिर्मितीच्या पोफळी येथील कामांमुळे शिरगाव आणि मुंढे या दोन गावांमध्ये ०१ नोव्हेंबर ते ०५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पाणीपुरवठा कमी होणार आहे. पोफळी येथील स्तर १ व स्तर २ उल्लोळक विहीर या आपत्कालीन झडप भुयार (EVT) दुरुस्तीचे काम कोयना बांधकाम विभागामार्फत होणार असल्याने हे आऊटेज (Outage) घेण्यात येत आहे. मात्र, पाणीटंचाईच्या या ज्वलंत प्रश्नावर राजकीय वळण लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पाणीपुरवठा कमी होणार असल्याचे पत्र उपविभागीय अभियंता, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग यांनी शिरगाव आणि मुंढे ग्रामपंचायतींना दिले होते. यावर तातडीने शिरगाव ग्रामपंचायतीत विशेष सभा आयोजित करण्यात आली. शिरगावच्या सरपंच सौ. निता शिंदे आणि मुंढेचे सरपंच सखाराम गायकवाड यांनी ग्रामस्थांना पत्राचा मजकूर वाचून दाखवला.
यावेळी ग्रामस्थांनी साधक-बाधक चर्चा करून असा एकमुखी ठराव केला की, “तातडीने पोफळी महानिर्मिती कंपनीचे अधीक्षक अभियंता चोपडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करावे आणि कामासाठी पंधरा दिवसांची मुदत घेण्यात यावी.” त्यानुसार सायंकाळी चार वाजता भेटीची वेळही निश्चित करण्यात आली होती.
मात्र, ग्रामस्थांचा ठराव डावलून, शिरगावच्या सरपंचांनी संबंधित अधिकारी यांची भेट न घेता परस्पर आमदार शेखर निकम यांची भेट घेतल्याचे समजते. यावरून पाण्याचा प्रश्न असताना वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी सरपंच अनिल शिंदे यांनी यावेळी पाणीप्रश्नी ग्रामपंचायतीच्या कारभारावर खडा सवाल केला. दोन वर्षांपूर्वीच कोयना जलविद्युत केंद्रामार्फत अशा कामाचे पत्र ग्रामपंचायतीला आले असतानाही, जुनी जॅकवेल अद्यापपर्यंत बंद अवस्थेत का आहे? संभाव्य पाणीटंचाईचा विचार ग्रामपंचायतीने का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी सरपंच सुधीर शिंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या आणि त्यानंतर अनिल शिंदे यांच्या काळात १५ वर्षे गावची पाणी योजना यशस्वीरित्या सांभाळली गेली. मात्र, सध्याच्या ग्रामपंचायतीने दोन वर्षांपासून जुन्या पाणी योजनेच्या पंपाला साधा स्टार्टरसुद्धा मारला नाही त्यामुळे पंप बिघडले आहेत.” जर त्यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर आज ही परिस्थिती आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे शिरगावमध्ये कमी दाबाने पाणी मिळणार आहे, तर वेताळवाडी आणि निगुडवाडी या वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. माजी सरपंच सुधीर शिंदे यांनी कोणताही खोट्या आश्वासनाला बळी न पडता, गावच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असा मार्मिक सल्ला सध्याच्या ग्रामपंचायत कारभाऱ्यांना दिला आहे.