चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली (Photo Credit - x)
चिपळूण: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील काँग्रेस पक्षात जोरदार राजकीय खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरात धवल प्लाझा सभागृहात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल तीन इच्छुक पुढे आले, तर २८ नगरसेवकपदांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धा आता उघडपणे समोर आली असून, पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस आणि शाब्दिक खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावचकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष आणि युवक व महिला काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नगराध्यक्षपदाची चर्चा सुरू होताच, पहिले नाव तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांचे समोर आले. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी ॲड. जीवन रेळेकर यांचे नाव पुढे केले. या दोन नावांवरूनच चर्चा चांगलीच तापली आणि वादाचे स्वरूप घेताना, “पक्षासाठी कोण किती योगदान देतो” इथपर्यंत बोलाचाली गेली. या दोन नावांवर एवढा गदारोळ झाला की, पक्षाकडे अर्जाद्वारे दाखल झालेल्या तिसऱ्या इच्छुक उमेदवाराबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही! २८ जागांसाठी ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अनेक प्रभागांत दोन ते तीन इच्छुक समोर आले आहेत, ज्यामुळे तिथेही छोटी धुसफूस सुरू आहे.
Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडून सन्मानपूर्वक न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असा स्पष्ट पवित्रा काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना साथ दिली असली तरी, आता स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता, काँग्रेससाठी ही निवडणूक मतदारांपेक्षा अंतर्गत गटबाजीमुळे जास्त आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यापुढे “तीन नगराध्यक्ष, ३३ नगरसेवक आणि अनेक मतप्रवाह” असा मोठा पेच उभा राहिला आहे.






