
Irfan Mujawar Tandulwadi Malshiras accident hero 2026, Pandharpur devotees pickup tempo falls into well,
Pandharpur News: माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात पंढरपूर येथील भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, प्रसंगावधान आणि धाडस दाखवत तांदूळवाडी येथील इरफान मुजावर या तरुणाने विहिरीत उडी घेऊन पाच जणांचे प्राण वाचवले. त्यामुळे परिसरात त्याचे ‘खुदा का फरिश्ता’ म्हणून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील भाविक सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप टेम्पो थेट विहिरीत कोसळला. याचवेळी टेम्पोच्या मागून दुचाकीवरून येत असलेल्या इरफान मुजावरने हा अपघात पाहताच तातडीने ग्रामस्थांना मदतीसाठी संपर्क साधला.
दरम्यान, विहिरीत एक लहान बाळ बुडत असल्याचे दिसताच इरफानने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. बाळाला बाहेर काढून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आणखी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दोन पुरुष स्वतः पोहत बाहेर आल्याची माहिती मिळाली.
मात्र, टेम्पो विहिरीत उलट्या बाजूने पडल्याने वाहनात अडकलेल्या सात महिला आणि सहा महिन्यांच्या बाळाला वाचविण्यात अपयश आले. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या पाच जणांना नवजीवन देणाऱ्या इरफान मुजावरच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, परिसरात त्याला ‘खुदा का फरिश्ता’ म्हणून गौरविले जात आहे.
विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी सांगितले की, रस्त्याचे काम सुरू असतानाच भविष्यात अपघात होण्याची शक्यता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. रस्त्याची उंची वाढविल्यामुळे विहीर आणि शेतजमीन खाली राहिल्याने वाहन थेट विहिरीत कोसळू शकते, अशी भीती व्यक्त करत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती. मागणी मान्य होत नसल्याने काही काळ रस्त्याचे कामही बंद पाडण्यात आले होते. त्यानंतर प्रशासन आणि ‘रोडवेज सोल्यूशन कंपनी’कडून कठडा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप कदम यांनी केला. अपघातस्थळी आजही कठडा उभारण्यासाठीचे लोखंडी कॉलम उघडे असल्याचे विहीर मालक कदम यांचे म्हणणे आहे. वेळेत संरक्षक भिंत उभारली असती तर आठ जणांना जीव गमवावा लागला नसता, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या अपघातात ‘जागरण-गोंधळ’ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या कलाकारांच्या जीपचा अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता आठ जणांचा मृत्यू झाला.त्या दहा वर्षांपूर्वीच्या दुर्दैवी घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत त्याच वेळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा मोठी जीवितहानी झाली आहे.
या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, ग्रामस्थांच्या तक्रारींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे.