हिंगोली : ऑनलाईन फसवणुकीत गेलेले 2 लाख 68 हजार 600 रुपये फिर्यादींना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. साईनगर येथील रहिवासी संजय सोमवंशी यांच्याशी अनोळखी मोबाईल क्रमांकधारकाने संपर्क साधून बजाज फायनान्स क्रेडिट कार्डमधून (Bajaj Finance Credit Card) बोलत असल्याची बतावणी केली.
क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्यासाठी व पॉईंट रिन्यूव्ह करण्यासाठी ओटीपी विचारून 2 लाख रुपये परस्पर ऑनलाईन ट्रान्सफर करून ठकसेनाने त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे बालाजीनगर येथील रहिवासी दीपक खानीवाले यांच्या क्रेडिट कार्ड व बचत खात्यामधून अनोळखी ठकसेनाने एकूण 69 हजार 550 रुपये परस्पर ऑनलाइन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पुष्पगुच्छ देऊन केली कृतज्ञता व्यक्त
दोन्ही तक्रारकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व सायबर पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी ट्रान्जेक्सनचा अभ्यास व तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधित नोडल अधिकारी यांना तत्काळ मेल करत तक्रारदार संजय सोमवंशी यांचे 2 लाख रुपये तसेच तक्रारदार दीपक खानीवाले यांचे 68 हजार 600 रुपये परत मिळवून दिले.