सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे. राज्य शासनाने टंचाई जाहीर केल्यानंतर जत, मिरज आणि पलूस या तीन तालुक्यांना मुबलक पाणी मिळत आहे. परंतु, राजकीय दबावाला बळी पडून पाटबंधारेचे अधिकारी कवठेमहांकाळ आणि तासगाव या दुष्काळी भागातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवत आहेत.
पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही
यापुढील काळामध्ये असा पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही. उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचे वाटप करताना तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय कराल तर याद राखा ; मी हजारो शेतक-यांना घेऊन तुमच्या दारात येऊन बसेन, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील टेंभू, आरफळ, विसापूर – पुणदी आणि म्हैसाळ सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पाण्यापासून वंचित असणा-या शेतक-यासह शुक्रवारी रोहित पाटील यांनी वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक मारली. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जयसिंगराव शेंडगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून जत आणि मिरज या दोन तालुक्यांना पाणी दिले जात आहे. परंतु, असाच प्रकार इतर सिंचन योजनेच्या बाबत सुरु आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाच पाणी दिले जात नाही, अशा तक्रारी घेऊन शेतकरी शुक्रवारी रोहित पाटील यांच्याकडे गेले होते. त्यांच्या तक्रारींचा पाढा ऐकून रोहित पाटील यांनी यांना सोबत घेऊनच पाटबंधारे विभागाचे वारणाली येथील कार्यालय गाठले.
अधीक्षक अभियंता चंद्रकांत पाटोळे, कार्यकारी अभियंते अभिनंदन हारुगडे, रोहित कोरे, ज्योती देवकर यांच्यासह प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपस्थित शेतक-यांनी अधिका-यांवर गंभीर आरोप केले. राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी पाणी वाटपाचे नियोजन करत आहेत. कांहीना फुकट पाणी मिळते. आम्ही पैसे भरायला तयार असून पाण्याचे पैसे भरुन घेत नाहीत. असे आरोप अधिका-यांवर केले.
यावर बोलताना रोहित पाटील म्हणाले, अधिका-यांनी शेतक-यांसाठी पाणी सोडावे, कुणाचेतर राजकारण टिकविण्यासाठी पाणी सोडण्याचे राजकारण करु नये. अन्यथा ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवावे असा इशारा दिला.
खासदारांकडे पाणी मागायला मला पाठवा
यावेळी उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर असे आरोप केले. जर अधिकाऱ्यांकडे पाणी मागायला गेलो तर पाणी मागायला खासदार संजय पाटील यांचेकडे जायला सांगतात. यावर रोहित पाटील म्हणाले की या पुढील काळात खासदारांकडे पाणी मागायला शेतकऱ्यांना पाठवू नका मला पाठवा.
अधिका-यांनी राजकरण करू नये : विशाल पाटील
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहे. या दौऱ्यात अनेक शेतकरी अधिकाऱ्यांच्या पाणी वाटपावर आक्षेप घेत असताना दिसतात. अधिकाऱ्यांनी पाण्याचे वाटप करताना हा आपला किंवा तो विरोधक अशा पद्धतीने वाटप करू नये. पाणी देत असताना त्यांनी राजकारण करण्याची गरज नाही. दुष्काळाने जनता होरपळून निघत असताना दिलासा देण्याची गरज असताना अधिकारी त्रास देत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही असेही पाटील म्हणाले.
Web Title: Remember if you do injustice to the farmers of the constituency ncp young leader rohit patil nryb