संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
तासगाव : शनिवारी दिनांक २७ सप्टेंबरला होणारा कार्यकर्ता संवाद मेळावा अतिवृष्टीमुळे रद्द झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी अखेर या मेळाव्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता हा मेळावा बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) तासगाव येथे हाेणार असून, मेळाव्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्याची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांनी प्रचार मोहिम सुरू केली असून, गावोगावी वातावरण तापू लागले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर थोडीशी मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांना या मेळाव्यामुळे पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर नेले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांना थेट निर्णय प्रक्रियेत सामील करून घेण्याच्या संजय पाटील यांच्या भूमिकेमुळे हा मेळावा त्यांच्या राजकीय भविष्याचा दिशादर्शक मानला जात आहे.
दरम्यान, ६ ऑक्टोबरलाच नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर होणार आहे, तर १३ ऑक्टोबरला जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर होणारा पाटील यांचा संवाद मेळावा ही केवळ कार्यकर्त्यांची बैठक न ठरता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत महत्त्वाचा ‘पॉवर शो’ ठरण्याची चिन्हे आहेत.
नवे समीकरण आकाराला येणार
संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, सत्तेसाठी आसुसून बसणे हा माझा मार्ग नाही, कार्यकर्त्यांच्या बळावरच लढाई लढायची आहे. त्यांच्या या संदेशामुळे विरोधकांतही खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील त्यांच्या मजबूत संपर्क जाळ्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांचे लक्ष आता तासगावच्या या मेळाव्याकडे लागले आहे. हा मेळावा फक्त तालुक्यातील नव्हे, तर सांगली जिल्ह्याच्या पुढील राजकारणात नवे समीकरण घडवणारा ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.
बड्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची चर्चा
तासगावात माजी खासदार संजय पाटील यांचा कार्यकर्त्यांचा संवाद होत असताना, मागील काही दिवसांत कराड येथे भाजपच्या बड्या मंत्र्यांसोबत झालेल्या त्यांच्या गुप्त बैठकीची जोरदार चर्चा रंगली आहे. ही बैठक आणि त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची घोषणा यामुळे या संवादाला राजकीय अँगल मिळतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पावसामुळे रद्द झालेला मेळावा बुधवारी होणार असून, त्यात कोणते संकेत मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.