eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari
औरंगाबाद: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर करण्यात आला आहे. मात्र आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड जनआंदोलन उभे करेल. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण वाटावं असं काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा. आप्पा धर्माधिकारी किंवा त्यांचे वडील पूर्वी नाना धर्माधिकारी यांना समाजसेवा म्हणून पुरस्कार दिला जातो. तर यांच्या हातून अशी कुठलीही समाजाची सेवा घडल्याचं आम्हाला माहिती नाही. कारण की हे पूर्णतः आरएसएसचे काम करतात. रामदासी बैठका घेतात. तसेच सर्वसामान्य माणसांची, महिलांची, तरुणांची दिशाभूल करतात, असा आरोप भानुसे यांनी केला.
[read_also content=”पहाटेच्या शपथविधीची पुन्हा निघाली आठवण, गिरीश महाजनांचा अजित पवारांना बंडखोरीवरून टोला, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/girish-mahajan-reply-to-ajit-pawar-on-rebell-nrsr-369527.html”]
या राज्याला या देशाला जो जिजाऊ, शिवरायांचा एक वारसा लाभलेला आहे. समतावादी, समानतावादी, मानवतावादी त्या सर्व बाजूंनी जर विचार केला तर त्यांना त्याचा पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हे अत्यंत चुकीच आहे. ही आमची मूळ भूमिका असल्याचेही संभाजी ब्रिगेडने म्हटले.
धर्माधिकारी यांच्यापेक्षाही अतिशय चांगलं काम करणारे कोकणामध्येच लोकांचे जीव वाचवणारे हिम्मतराव बाविस्कर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी अहोरात्र काम करणारे वकील पुरुषोत्तम खेडेकर, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, याचबरोबर आदिवासीसाठी मेळघाटमध्ये डॉ. कोल्हे दांपत्य काम करतात. समाजाच्या सर्वसामान्य घरापर्यंत आणि सर्व धर्मीयांमध्ये पोहोचलेले विदर्भामध्ये सत्यपाल महाराज आहेत. असे अनेक मान्यवर आहेत. या लोकांना का दिला नाही. केवळ आणि केवळ एका समाजाचे, आरएसएसचे काम करणाऱ्या लोकांनाच हा पुरस्कार द्यायची ही महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर संभाजी ब्रिगेड बहिष्कार टाकत असून, महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत आहे. त्वरित महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल,असा इशारा देखील यावेळी संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.