sandeep deshpande press live on Raj Uddhav Thackeray come together
Sandeep Deshpande Press Live : मुंबई : महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये त्रीभाषिक सूत्र स्वीकारले असल्याचे सांगत हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. मात्र तीव्र विरोधानंतर अनिवार्य शब्दू काढून पर्यायी भाषा म्हणून हिंदी ठेवण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. याबाबत मनसे पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी घोषणा केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषा आणि अस्मितेसाठी एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, “काल राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर 06 तारखेला आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी मोर्चा काढणे योग्य होणार नाही. आणि 07 तारखेला सोमवार आहे तर सुट्टीचा दिवस नाही, त्यामुळे शिक्षक आणि पालकांना यादिवशी मोर्चामध्ये सहभागी होणे जमणार नाही. त्यामुळे 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे. राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय झेंडा वापरण्यात येणार नाही. मराठी माणसांची ताकद ही काय आहे हे या मोर्चा दाखवून देईल,”असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मराठी भाषेवर तुम्ही आक्रमक करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला लक्षात येईल. हे एक सकारात्मक पाऊल आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांसोबत संपर्क साधणार आहोत. अगदी भाजपमधील मराठी भाषेबद्दल प्रेम असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील आम्ही संपर्क साधणार आहे. जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सर्वांना आम्ही मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन करणार आहोत,” अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, मराठी भाषेसाठी आमची तुरुंगामध्ये सुद्धा जाण्याची तयारी आहे. मनसैनिकांच्या अंगावर अशा अनेक राजकीय केसेस आहेत. मराठी माणसांसाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला. यासाठी मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो. राजकीय मतभेद आणि वादविवाद सोडून मराठी माणूस म्हणून एकत्र येत आहोत. ही भावना फार आनंद देणारी आहे. ज्यांच्या पोटामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने पोटात दुखत आहे त्यांना औषध देऊ, असा आक्रमक पवित्रा संदीप देशपांडे यांनी घेतला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये देखील मुंबई पालिकेवर राज्य राखण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येतील का याची चर्चा रंगली आहे. याबाबत देखील माध्यमांनी संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, “राजकीय दृष्ट्या दोन्ही बंधू एकत्रित येणार की नाही याबाबत ते दोघे निर्णय घेतील. यावर मी उत्तर देणे हे लहान तोंडी मोठी घास घेतल्यासारखे होईल. याचा निर्णय ते करतील. आज मराठी लोकांसाठी दोघं एकत्र येत आहेत त्यांचा आनंद आपण साजरा करु,” अशा भावना मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केल्या आहेत.