sanjay-nirupam
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत’, अशी टीका त्यांनी केली.
हेदेखील वाचा : पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे अनेक पक्ष तयार होतात आणि…; संजय राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार
मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा लाचारीचे एक उदाहरण आहे, असे निरुपम म्हणाले. ‘बाळासाहेब ठाकरे हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत.
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला रद्द
पुणे, नाशिकमध्ये पूरस्थिती असून त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि उपाययोजना करत आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला. मात्र, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या दारात गेले आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.
मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यांचे सरकार येणार नाहीच पण तरीही मविआतला प्रत्येक नेता मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, असा टोलाही निरुपम यांनी लगावला.
कुरघोडी करण्याचा प्रयत्न
नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासह आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, उबाठाने यावर कुरघोडी करुन दिल्ली गाठली. मविआतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Big News ! 15 ऑगस्टनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार; ‘हे’ दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?