संजय पाटलांची ‘एकला चलाे रे’ची भूमिका; तासगावातील संवाद मेळाव्यातून मोठी घाेषणा
तासगाव : तासगावात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय पाटील यांनी राजकारणातील मोठी घोषणा केली आहे. ‘आता माझं आयुष्य फक्त कार्यकर्त्यांसाठीच!’ संजय पाटलांच्या या विधानाने सभागृहात एकच जल्लोष उसळला. या मेळाव्यामुळे तासगावच्या राजकीय वातावरणात नवा उत्साह आणि नवं समीकरण निर्माण झालं आहे. आता जिल्ह्याच्या राजकारणात कोणता बदल घडतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्यात विलास पाटील, प्रमोद शेंडगे, जनार्दन पाटील, बळी पाटील, संभाजी खराडे, पी. के. पाटील, सुखदेव पाटील, रमेश कोळेकर, किशोर पाटील, सुनील जाधव, आर. डी. पाटील, महेश हिंगमिरे, कुमार शेटे, महादेव सूर्यवंशी, रणजित घाडगे, अजित माने, डॉ. प्रताप पाटील, शंकर मोहिते, नितीन पाटील, महेश पाटील, ऋषिकेश बिरणे, शशिकांत जमदाडे, उमेश पाटील, चंद्रकांत कदम, बाबासो पाटील, जाफर मुजावर, अविनाश पाटील, दिग्विजय पाटील, हणमंत पाटील, किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.
स्थानिक निवडणुकामुळे कार्यकर्त्यांचा उत्सव
पाटील म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय प्रवासाला दिशा दिली. सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैशाळ या महत्वाच्या योजनांसाठी निधी मिळवता आला, रस्ते, रेल्वे, जलजीवन मिशनसारख्या प्रकल्पांची कोट्यवधींची कामं झाली. हे यश माझं नसून कार्यकर्त्यांचं आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या लढतीत कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्सव आहे. मी त्यांच्यासोबत उभा आहे. त्यांच्या यशातच माझा आनंद आहे, असे पाटील म्हणाले.
मी नेता म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी मी सतत कार्यकर्त्यांसोबत असेन. – प्रभाकर पाटील, युवा नेते