फोटो - टीम नवराष्ट्र
तासगाव : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि राजाकरण रंगले आहे. सांगलीमध्ये देखील राजकारण रंगले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे अडचण निर्माण झाली. पण, एका पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते. ज्यांना आपण सहकार्य केले त्या मंडळींनी अडचणीच्या काळात आपला विश्वासघात केला. आपणास अडचणी निर्माण केल्या. मात्र दोन महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुका आहेत. ही निवडणूक आपणाला जिंकायची आहे, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार संजय पाटील यांनी घेतला आहे. यावेळी स्वर्गीय आर. आर. पाटील कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप त्यांनी केला.
तासगावमधील दत्तमाळावर आयोजित प्रभोदय कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत मला सहकार्य केले आहे. लोकांची शक्ती, आशीर्वाद, बळाच्या जोरावर मी दोन वेळा खासदार झालो. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीचे राजकारण झाले. त्यामुळे आपणास अडचणी निर्माण झाल्या. आपण ज्यांना मदत केली त्यांनी या निवडणुकीत आपल्या सोबत विश्वासघात केला. मात्र दोन महिन्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत आपण आपली शक्ती, ताकद दाखवून द्यायची आहे. विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. प्रभाकर पाटील तुमच्यासाठी काम करत आहे, असे मत माजी खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी राजकीय निशाणा साधला. संजय पाटील म्हणाले, काहींना केवळ मोठे बोलण्याची सवय आहे. हातभर लाकूड आणि दहा हात ढलपी असं सुरू आहे. आपण जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली. पाणी, रस्ता, रेल्वेचे प्रश्न सोडवले. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या. लोकांनी आशीर्वाद दिले म्हणून हे सर्व करता आले. उद्याच्या काळात पुन्हा ताकतीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे. जिंकायची आहे. त्यामुळे दोन महिने ताकदीने काम करूया. तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया. गतिमान विकास करूया, असे आवाहन माजी खासदार संजय पाटील यांनी केले.