ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट स्वभाव असतो. त्या त्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव देखील तसा होत जातो. नवग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे केतू. केतूला छाया ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, केतूचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर खोलवर जाणवतो. केतू आध्यात्म, गूढविद्या, वैराग्य, अध्यात्मिक प्रवृत्ती तसेच भूतकाळातील कर्माशी निगडित असतो. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत केतू प्रबळ असतो किंवा त्याच्या विशेष दृष्टीचा प्रभाव असतो, त्यांचा स्वभाव साधारणतः अनोखा व रहस्यमय आढळतो.
अशा व्यक्ती बहुतेक वेळा आत्मपरीक्षण करणाऱ्या असतात. त्यांना एकांत आवडतो व गर्दीत राहूनही ते स्वतःमध्ये रमलेले असतात. या लोकांच्या मनात अध्यात्माबद्दल खोलवर ओढ असते. धर्म, ध्यान, तत्त्वज्ञान याकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो. ते अनेकदा सांसारिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक ज्ञानाला जास्त महत्त्व देतात.
केतूच्या प्रभावाखालील व्यक्तींमध्ये वैराग्याची प्रवृत्ती तीव्र दिसून येते. त्यांना जास्त भौतिक सुखसोयींची आस नसते. साधेपणा, शांतता व संयम यांना ते महत्त्व देतात. कधी कधी त्यांचा स्वभाव अंतर्मुख व गूढ वाटतो. अनेकांना त्यांचे विचार समजणे कठीण जाते कारण ते नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करतात.
मात्र याच्या देखील चांगल्या आणि नकारात्मक बाजू देखील आहेत. पत्रिकेत जर केतू अशुभ स्थानी असेल तर व्यक्तीला गोंधळ, संभ्रम, मानसिक ताण यांना सामोरे जावे लागू शकते. निर्णयक्षमता कमी होऊ शकते किंवा विचारात अस्थिरता जाणवू शकते. पण जेव्हा केतू शुभ स्थानी असतो तेव्हा तो अध्यात्मिक उन्नती, गूढ ज्ञानाची प्राप्ती व जीवनातील खरी दिशा दाखवतो. केतूच्या प्रभावाखालील व्यक्तींचा स्वभाव रहस्यमय, आत्मचिंतक, आध्यात्मिक व वैराग्यपूर्ण असतो. ते नेहमी भौतिकतेच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे लोक समाजात वेगळ्या ठिकाणी ओळख निर्माण करतात.
केतूच्या प्रभावाखाली असलेल्या माणसांना सिक्स सेन्स असतो. कारण केतू हा आध्यात्म, गूढविद्या, अंतर्ज्ञान आणि अदृश्य शक्तींशी संबंधित ग्रह आहे.त्यांना आधीच एखाद्या गोष्टीची चाहूल लागते – उदा. एखादा प्रसंग घडण्याआधी मनात संकेत येणे. या मंडळींना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येतो.स्वप्नांमधून किंवा संकेतांमधून त्यांना भविष्यातील घटनांची चाहूल मिळते.काही वेळा त्यांच्या मनातले विचार अगदी प्रत्यक्षात उतरतात.लोकांची खरी भावना किंवा मनातील विचार हे ते सहज ओळखू शकतात.
रहस्य, गूढ, ज्योतिष, अध्यात्म, टॅरो, मंत्रतंत्र याकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो.त्यांची इंट्यूशन पॉवर इतकी तीव्र असते की ते कधी कधी कोणाला भेटण्याआधीच त्याच्याबद्दल कल्पना करतात.संकटाच्या वेळी त्यांचे मन आधीच सावधान करते, म्हणून असे लोक स्वतःला व इतरांना वेळेवर वाचवू शकतात, असंही म्हटलं जातं.