
Sanjay Raut PC: अजितदादांच्या कुटुंबातील व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री होणार असेल, तर ही त्यावर मत व्यक्त करण्याची वेळ नाही, अशी प्रतिक्रीया ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते. तसेच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याच्या बातम्या वाचल्या. पण हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्र अजूनही अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून सावरलेला नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या अनुभवी नेत्यांची मोठी फळी त्यांच्या पक्षात असताना जर हा निर्णय झाला असेल, तर तो पक्षाचा निर्णय आहे. मात्र, त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी असल्याने शेवटी हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच घेतला असावा, असे मोठे वक्तव्य राऊत यांनी यावेळी केले.
अजित पवार यांचा पक्ष हा एक स्वतंत्र गट असल्याने शरद पवार जे सांगत आहेत ते सत्य असून, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत कोणालाही पूर्वकल्पना नव्हती असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असल्याचे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा केली आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला असावा.
यावेळी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत भाजपला ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष’ असे संबोधले. भाजपचा दुःख किंवा संवेदनांशी कधीही संबंध आलेला नाही, अशी टीका राऊत यांनी केली असली तरी ही वेळ या विषयावर सविस्तर बोलण्याची नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.