Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही...; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
यावेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजित पवार यांचीच इच्छा होती. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होत्या. येत्या १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करणार होतो. पण अजित पवार यांच्या जाण्याने या विलीनीकरणात खंड पडल्याचे दिसत आहे. जयंत पाटील आता अंतिम निर्णय घेतील असेही अजित पवार म्हणाले होते.
तुमच्याच कुटुंबातील सून उपमुख्यमंत्री होणार आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे, असं वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, जे गेले त्यांना परत आणू शकत नाही. सध्याच्या परिस्थीचा सामना करणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. सध्याच्या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी, कोणीतरी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच अनेक राजकीय निर्णय घेण्याच्या घाईबद्दल शरद पवार म्हणाले, “या सर्व चर्चा येथे होत नाहीत. त्या मुंबईत होत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेते या चर्चा करत आहेत. जे दिसत आहे त्यावरून असे दिसते की हे निर्णय त्यांनी घेतले आहेत. मी यावर भाष्य करणार नाही.”
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “हा निर्णय राष्ट्रवादीचा होता. पवार कुटुंबाला विश्वासात घेण्यात आले नाही, आम्हाला यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी खूप घाई करण्यात आली असे वाटत नाही का, या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी उत्तर देणे टाळले आणि तुम्ही हे मला का विचारत आहात, असा प्रतिप्रश्न त्यंनी उपस्थित केला.
तसेच, पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीतील समीकरणे बदलणार?
शरद पवार यांनी भाजपसोबत युतीची कोणतीही शक्यता स्पष्टपणे नाकारली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी भाजपसोबत का जाऊ? आमच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या आहेत.” त्यांच्या विधानामुळे भाजपच्या परिस्थितीत दोन्ही गटांमधील एकता पुढे जाऊ शकते या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला. कथित विमान अपघात आणि त्याच्या चौकशीबद्दल विचारले असता त्यांनी थोडक्यात पण स्पष्ट उत्तर दिले: “अपघात हा अपघात असतो.” पवार म्हणाले की नागरी विमान वाहतूक विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि सीआयडी चौकशीचीही घोषणा करण्यात आली आहे.






