‘गजर कीर्तनाचा,सोहळा आनंदाचा’! मोठ्या थाटात पार पडला माऊलींचा ‘नीरा स्नान’ सोहळा
वारकरी आता पुढील मुक्कामासाठी साताऱ्याकडे मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुशासन, भक्ती, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे.
नीरा/राहुल शिंदे: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तीभावाने भरलेला शाहीस्नान सोहळा आज गुरुवारी नीरा नदीच्या काठावर थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यां वर्षी देखील या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी आणि माऊली भक्तांनी नदी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
आजच्या दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा नीरा येथे थांबला होता. सकाळी साडेदहा वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा नगरीमध्ये दाखल झाला यावेळी सरपंच तेजस्वी काकडे ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवरांनी या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.विस्रांतीनंतर दुपारी बरोबर २ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा शाहीस्नान सोहळा सुरु झाला. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या विसावा स्थळावरील विसावा संपल्या नंतर ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा नदीकडे (दत्त घाटाकडे ) मार्गस्थ झाला. या क्षणांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पुलावर आणि नदीकाठी हजारो वारकऱ्यांनी गर्दी केली होती.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढून नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या. या वेळी परिसरात “माऊली माऊली” च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. भक्तीभाव आणि श्रद्धेने भारलेल्या वातावरणात, माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. या सोहळ्याला अनेक मान्यवर, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, कीर्तनकार आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्नानानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानंतर माऊलींच्या पादुका पालखी रथात ठेवण्यात आल्या आणि पुढील मुक्कामासाठी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील लोणंदकडे मार्गस्थ झाली. या वेळी नीरा नदी काठावर सतारकरांनी माऊलींचे मोठ्या भक्ती भावाने स्वागतं केले लोणंद येथे आजचा पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. सातारा जिल्हा हा वारी सुरु करणाऱ्या हैबतबाबांचे जन्मस्थान असून, वारकऱ्यांसाठी या ठिकाणाचे विशेष महत्त्व आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आज माऊलींना भक्तिभावाने निरोप दिला. नीरा नगरीतील वारकऱ्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी आणि श्रद्धावानांनी माऊलींचे शाहीस्नान पाहून आपले जीवन धन्य मानले. अनेकांनी या प्रसंगी तीर्थरुप जलाचे दर्शन घेऊन डोक्यावर घेतले. आषाढी वारीचा हा टप्पा अत्यंत भक्तीने भरलेला आणि पवित्र मानला जातो. वारकऱ्यांसाठी हा क्षण म्हणजे जीवनातील अध्यात्मिक शिखरगाठ असल्यासारखा अनुभव असतो. माऊलींच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे अद्भुत प्रतीक आहे.
वारकरी आता पुढील मुक्कामासाठी साताऱ्याकडे मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुशासन, भक्ती, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. पुणे जिल्ह्याच्या वतीने नालासोपाराचे आमदार राजन नाईक, अप्पर पोलिस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, डीवायएसपी तानाजी बरडे, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांच्यासह नीरा व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला.
सातारा जिल्ह्याच्या वतीने खा.उदयनराजे भोसले, पालकमंञी शंभुराज देसाई, मदत व पुनवर्सन मंञी ना.मकरंद पाटील, ग्रामविकास मंञी जयकुमार गोरे,माजी खा.रणजितसिंह निंबाळकर, साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलिस प्रमुख वैशाली कडुकर ,जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, पाडेगांवचे सरपंच मंगल माने, उपसरपंच दशरथ धायगुडे, माजी सरपंच विजय धायगुडे, रघुनाथ धायगुडे, संतोष माने यांनी जोरदार स्वागत केले.
Web Title: Sant dyaneshwar mauli paduka nira snan ashadhi wari 2025