Santosh Deshmukh murder accused walmik Karad given VIP treatment in Beed Jail
बीड : बीडमधील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कुख्यात गुंडांचे असणारे राजकीय संबंध आणि पोलिसांकडून कारवाईस होणारी दिरंगाई यामुळे बीडमधील गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये देखील व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. स्पेशल चहा, चिकन आणि झोपण्यासाठी चक्क सहा ब्लॅकेट दिल्या जात आहेत. यामुळे पुन्हा एकदा बीड मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाचा कारभार समोर आला आहे.
संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यामध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचे यापूर्वी देखील समोर आले होते. यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आल्याचे समोर आले होते. प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कारवाई पण झाली होती. यानंतर आता पुन्हा बीड तुरुंगात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला आहे. त्याच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला मागील आठवड्यामध्ये जामीन मिळाला होता. जामीनानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अनेक गंभीर आरोप केले असून यामुळे बीडमधील प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जात असून जेवणात त्याला चांगल्या तेल लावून चपात्या देखील दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्याला जेवणामध्ये चिकन दिले जात आहे. कासले याने केलेल्या आरोपांमुळे वाल्मिक कराड हा खरंच आरोपी म्हणून तुरुंगामध्ये आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
25 हजारांची कॅन्टिनमधून खरेदी
कासले यांनी आणखी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगामध्ये प्रत्येक कैद्याला 10 हजारांपर्यंत खरेदी करता येते. वाल्मिक कराड हा त्याच्यासह इतर कैद्यांच्या नावावर तो कारागृहातील कॅन्टीन मधून 25 हजारांची खरेदी करत असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. इतर कैद्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले जातात तर कराडला ब्लॅंकेट दिले असून त्याचा वापर तो गादीसारखा करत आहे. त्याला तब्बल सहा ब्लॅकेट दिले जातात असा आरोप कासलेने आपल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे समोर आले होते. पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराड याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात कैद्यांसाठीचे प्रोटोकॉल डावलून विशेष वागणूक देण्यात आली होती. मिनी आयसीयू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये वाल्मिक कराडवर उपचार करण्यात आले होते. याठिकाणी आरसीपीसीसह 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि आणखी काही पोलीस कर्मचारी 24 तास तैनात होते.