राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्यावर स्पष्ट मत मांडले (फोटोृ - सोशल मीडिया)
मुंबई : वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणानंतर राज्यभरात एकच चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठत आहे. तर याच प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आता रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण आल्यास रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनाही लिहिले पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीने राजकीय रणकंदन माजण्याची शक्यता आहे.
वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना अटक
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी हगवणे याचा मुलगा, पत्नी आणि मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना १६ मे रोजी भुकूम परिसरातील तिच्या सासरच्या घरी घडली, जिथे वैष्णवीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.