Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा; अंनिसचा सरकारला इशारा
सातारा : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासातील प्रलंबित मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली असली, तरी या हत्येमागील सूत्रधारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याचा दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे तपास यंत्रणांनी तपासाला अधिक गती देऊन सूत्रधारांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
अंधश्रद्धा, जादूटोणा आणि त्यातून होणारे शोषण रोखण्यासाठी महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर देशभरात कायदा लागू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने याबाबत ठोस पावले उचलावीत, असे अंनिसने म्हटले.
दरम्यान, प्रकरणातील काही आरोपींच्या सुटकेसंदर्भातील न्यायालयीन निर्णयाला आव्हान देण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सुधारणांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करत समाजात निर्भयता आणि विवेकवाद रुजविण्याचा निर्धार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यासह देशभरात व्याख्याने, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ आणि विविध जनजागृती उपक्रम घेण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना अंनिसच्या राज्य अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, उदय चव्हाण, संतोष भिलारकर, प्रकाश खटावकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, रोहित घाडगे आदी उपस्थित होते.






