Satara News : वेताळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न; डिजिटल शाळा, सीसीटीव्ही आणि घरकुल योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य
वेताळवाडी ग्रामपंचायत अधिकारी शितल खोकले यांनी उपस्थित ग्रामसभेतील ग्रामस्थांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. शासकीय परिपत्रकानुसार योजना व अभियानाची माहिती दिली. यामध्ये ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी निवड तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि घरकुल योजनेची कामे नियमानुसार व वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबत ग्रामसभेत विचारविनिमय करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांवरही चर्चा होऊन आवश्यक त्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आले. प्राथमिक शाळेतील वरिष्ठ शिक्षक धनराज अडसुळे यांनी शाळेला भेडसावणाऱ्या विविध अडचणी सर्वांच्या समोर मांडल्या. त्यानंतर गावातील प्राथमिक शाळांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांमध्ये डिजिटल सुविधा वाढविणे तसेच डिजिटल शाळेचा प्रस्ताव विचारात घेऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबतही महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.
गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामस्वच्छतेबाबत चर्चा झाली. कचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा प्रभावीपणे राबविणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे यावरही ग्रामस्थांनी सूचना मांडल्या. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत उपलब्ध असलेल्या सरकारी जागेचा योग्य वापर करून भविष्यात विविध विकासकामांसाठी नवीन इमारती उभारण्याबाबतही विचार मांडण्यात आला. गावाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासकीय जागेचा नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिक्षण, वैद्यकीय सुविधा, महसूल विभाग, पाणीपुरवठा तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि संबंधित विभागांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामसभेला सरपंच लक्ष्मीबाई पुजारी, विशेष अतिथी पांडुरंग नलवडे यांच्यासह उपसरपंच संतोष पवार, सदस्य संभाजी जाधव, सचिन नलवडे, संध्याराणी पवार, शोभा म्हस्के इत्यादी ग्रामपंचायत सदस्य, विविध खात्यांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विकासकामांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.






