Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये दर (Sugarcane Rate) जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा किसान काँग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी दिला आहे. ऊस उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
साखर कारखान्यांकडून आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराचा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचा आरोप इनामदार यांनी केला. कारखाने सुरू करण्यासाठी हालचाली वेगाने होत असताना ऊसदर निश्चित करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ऊसदर आणि रास्त व किफायतशीर दराबाबत (FRP) स्पष्टता नसताना गाळप सुरू करण्याची घाई कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
साखर कारखानदारांनी ऊस गाळप सुरू करण्यापूर्वी प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी इनामदार यांनी केली आहे. दर निश्चित होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोड करू देऊ नये आणि कारखान्यांना ऊसपुरवठा करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन केल्यास त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतात; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
ऊस नियंत्रण आदेश १९६६ आणि आवश्यक वस्तू कायदा १९५५ यांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमभंग करणाऱ्या साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक तातडीने बोलावून ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही इनामदार यांनी केली आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने आगामी गाळप हंगामापूर्वी सातारा जिल्ह्यात आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे.






