Mahadevi Elephant: 'माधुरी'ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर सरसावले; 'ही' मोहीम राबवत थेट....
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर एकच जनआक्रोश सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हत्ती परत मठामध्ये परतला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्नांची शर्थ सुरु आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सह्यांची मोहीम राबवली.
सतेज पाटील यांच्या मोहिमेमध्ये तब्बल २ लाख ४२१ लोकांनी स्वाक्षरी केली असून हा जनआक्रोश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि जिव्हाळ्याचे नाते असणारी “महादेवी” हत्तीण नांदणी मठाकडे परत यावी, अशी कळकळीची जनभावना व्यक्त करणाऱ्या २ लाख ४ हजार ४२१ लोकांच्या स्वाक्षरी असलेल्या सर्व फॉर्मचे पूजन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते नांदणीमध्ये करण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मठाधिपती यांच्याशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. महादेवी हत्तीणीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
खासदार धनंजय महाडिक व धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली. पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल असं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले. जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं आबिटकरांनी माहिती दिली.
‘महादेवी’साठी एकटवले राजकारणी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेल्याच्या कृतीवर भाष्य केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “कायदा वाकवून अन्याय केला जातो, याचे उदाहरण म्हणजे हत्तीणीला वनतारामध्ये नेणे. माझ्याकडे नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीची तब्येत चांगली असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पत्रं आहेत. माधुरी हत्तीण वनताराकडे नेण्यासाठीच पेटा काम करत होतं.पेटाची भूमिका प्रामाणिक असती, तर त्यांनी वनतारा सोडून अन्य ठिकाणी हत्तीण पाठवली असती. पेटा स्थापन होण्यापूर्वीपासून माधुरी हत्तीण या मठात आहे. अंबानीला हत्तीची गरज का आहे? हे कळेना झाले आहे.”