पुणे : चऱ्होली येथे 70 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलबसचा अपघात झाला. स्कूलबसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आळंदी मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकात घडली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्कूल बस गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. यावेळी बसमध्ये 70 विद्यार्थी होते.
अपघात झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे, सुरज दाभाडे, ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. माजी महापौर नितीन काळजी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्कूलबस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढली. या अपघातामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.