'शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी आमदारांच्या डोक्यावर बंदूक'; काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप
कोल्हापूर : शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आमदार सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधान केले.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना, गोकुळचा कारभार वाढल्यानेच संचालक संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यानी सांगितले. गोकूळची उलाढाल ४ हजार कोटींवर गेली आहे. जनावरांची संख्या वाढली आहे. जिल्हा बँकेची व्याप्ती वाढली म्हणूनच संचालक वाढीचा निर्णय घेतला.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत; अधिवेशनातच नवीन उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता
सहकाराच्या तरतुदीनुसारच आणि गोकुळचा वाढलेला कारभार पाहता संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावरून महाडिक कुटुंबीय आणि महायुतीतील काही नेते टीका करत असल्याचा संदर्भ देत, ‘तुझं माझं जमेना. तुझ्याशिवाय करमेना’ अशी स्थिती सध्या महायुतीमध्ये सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात काही दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठाच्या समर्थनात केलेलं आंदोलन यावर बोलताना त्यांनी या महामार्गाचं समर्थन करण्याबाबत कदाचित आमदार राजेश क्षीरसागर यांना आदेश आला असेल. खाजगीत ते शक्तिपीठाची गरज आहे का नाही हे अधिक विस्तृतपणे सांगतील, असा टोलाही त्यानी लगावला.
सातबारा उतारे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केले असतील तर शक्तिपीठाच्या विरोधात एवढ्या हरकती का आल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या. यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील असो किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे, असा खळबळजनक आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी गोकुळची निवडणूक लागण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मश्रीफ यांच्यावर टोकन वाटपाचा आरोप केला होता. यावर आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महाडिक यांचा हा आरोप म्हणजे विनोद असल्याची टीका त्यांनी केली.