पुणे : लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आणि सहकाऱ्यांनी २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी शरद पवार हे भाजपमध्ये जाण्यासाठी तयार होते असा दावा केला होता. निवडणूकीपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. या दाव्यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रफुल्ल पटेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये बंड पुकारत महायुतीमध्ये सामील झाले. त्यांच्या या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट देखील झाली होती. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यानंतर शरद पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी ५० टक्के तयार झाले होते असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. आज पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पटेल आणि फडणवीस यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
तेव्हा गोष्ट वेगळी होती…
पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणाले, ‘त्यांनी जे विधान केले, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही,’ असे शरद पवार म्हणाले. याशिवाय १९९६ साली एचडी देवेगौडा हे शरद पवारांना पंतप्रधान बनविण्यासाठी तयार होते. मात्र शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि त्यानंतर आता भाजपाबरोबर जाण्याच्या निर्णयावरही त्यांनी माघार घेतली, अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली होती. त्याबाबत उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ‘१९९६ सालची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी मला तेव्हा योग्य वाटले नाही, म्हणून मी देवेगौडा यांच्यासोबत गेलो नाही,’ असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे चर्चांना पूर्णविराम लागला आहे.