राज-उद्धव ठाकरेंच्या ५ जुलैच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत; समोर आलं मोठं कारण
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंदूंनी ५ जुलैचा निषेध मोर्चा विजयी मोर्चात रुपांतर केला. येत्या शनिवारी हा मेळावा होणार असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निमित्त एकत्र येतात याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील काही नेते या मेळाव्याला येण्याची शक्यता आहे, शरद पवार यांनी मात्र आपण या मेळाव्याला हजर राहणार नसल्याचं म्हटलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. “त्या दिवशी माझे आधीपासूनचे नियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी मेळाव्यात जाणार नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आमच्या पक्षातर्फे निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय आहे,” असं पवार म्हणाले.
दरम्यान, हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आल्यानंतर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सुरुवातीला हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर त्या ठिकाणी विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे या मेळाव्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर मराठी जनतेचा विजय आहे. त्यामुळे या मेळाव्यास कोणतेही पक्षीय लेबल लावू नये. “मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे,” असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं. “मराठी जनतेच्या एकजुटीमुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, आता शिक्षण विषयक निर्णयांवरही सतर्क राहण्याची वेळ आहे. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून शिक्षणाचा खेळ सुरू झाला आहे. कोणतीही समिती बसली तरीही हिंदी सक्तीचा डाव यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
Eknath Shinde : 18000 शाळा होणार बंद? विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
५ जुलै रोजीचा मेळावा मराठी अस्मितेचा महोत्सव ठरणार आहे. आंदोलनाच्या वेळी जशी पक्षभेद विसरून एकजूट झाली, तशीच एकजूट या विजयी मेळाव्यातही दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान पवार यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांवर चर्चांना उधाण आलं आहे.