मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्यामुंबईतील निवासस्थानी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेत सीआरपीएफला त्यांची सुरक्षा व्यवस्था परत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या निवासस्थानी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, यावेळी आपल्याला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी सुरक्षा व्यवस्था परत केली. तसेच, जी काही सुरक्षा द्यायची असेल तर घराबाहेर द्या. पण गाडी बदलणे आणि गाडीत दोन सुरक्षा रक्षक असणे, याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेेदेखील वाचा: केंद्राचा झेड प्लस सुरक्षा देण्याचा हेतू काय?;शरद पवारांनी केली पोलखोल
दरम्यान, शरद पवार यांना एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था का पुरवण्यात येत आहे. यासंदर्भातही कोणतेही ठोस कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले नाही. या सुरक्षेबाबत शरद पवार स्वत:च अनभिज्ञ आहेत. शरद पवार यांच्या जिवाला धोका असलेली अशी कोणती माहिती सुरक्षा व्यवस्थेकडे आहे. याबाबतही शरद पवार यांना कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्याला एवढ्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बदलापूर बाल अत्याचार प्रकरणानंतर आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची राज्य सरकारकडे मागणी केली होती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे.त्यामुळे आपली सुरक्षाव्यवस्था काढून घ्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
हेेदेखील वाचा: “..तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची सोय करावी”; राणेंचा ‘या’ आमदारावर गंभीर आरोप
शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय जाहीर झाला त्यावेळी त्यांनीच या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली होती. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात माझ्या हालचालींची ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता.