माजी खासदार नीलेश राणे (फोटो- फेसबुक)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेनंतर महाविकास आघाडीने सरकारवर टीका सुरू केली आहे. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करून मजबूत आणि मोठा पुतळा बसवण्याची मागणी महाविसकास आघाडीने केली आहे. तर या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेची माफी मागितली आहे. मात्र, अवघ्या 9 महिन्यांत शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर राणे-ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान आता माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राजकोट किल्ल्यावर घटना घडल्यानंतर आमदार वैभव नाईक १५ मिनिटात घटनास्थळी कसा पोहोचला? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. निलेश राणे म्हणाले, ”आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.”
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला.
आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक…— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 29, 2024
माजी खासदार निलेश राणे यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला कोल्हापुरातून अटक केली आहे. मात्र पुतळा उभारण्याचे कंत्राट घेतलेला जयदीप आपटे अजूनही फरार आहे.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच यासंदर्भात एका कन्सल्टन्सी कंपनीशी संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअर अमरेश कुमार यांनी भाष्य केले आहे. महाराजांचा पुतळा पडण्यामागे गंजलेले नट आणि बोल्ट हे कारण असू शकते. पुतळ्याच्या स्थिरतेसाठी त्याच्या पायांवर संपूर्ण संरचनेचे वजन असते. त्यामुळेच पुतळ्याचे डिझाइन करताना त्याच्या पायांच्या टप्प्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. . 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. पण भारतीय मानक ब्युरोनुसार, कोणताही पुतळा बनवताना वाऱ्याच्या तीन पट वेग लक्षात घेऊनच पुतळा बनवला जातो, असेही अमरेश कुमार यांनी म्हटले आहे.