
तासगाव–कवठेमहांकाळच्या शाश्वत विकासाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर
यावेळी उमेदवार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शहाजीराजे व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्यात कृषी व जलसिंचन, पाणीपुरवठा व वीज, ग्रामीण पायाभूत सुविधा, महिला व बालविकास, शिक्षण व आरोग्य, युवक कल्याण तसेच समाजकल्याण व सामाजिक न्याय या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत जलसिंचन योजना, आधुनिक कृषी सुविधा, प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी, अविरत वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी आदी बाबींचा यात समावेश आहे.
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने नसून ठोस आणि शाश्वत विकासाचा आराखडा आहे. सत्ता आल्यास तासगाव व कवठेमहांकाळ पंचायत समित्या जिल्हा परिषद शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून वगळण्याचा ठराव पारित करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या पंचायत समित्या असतील. हा माझा शब्द आहे.
यावेळी, सांगली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, अविनाश पाटील, तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे तालुकाअध्यक्ष विश्वास पाटील, शंकर पाटील, युवराज पाटील, कवठेमहांकाळ तालुक्याचे अध्यक्ष संजय पाटील, हणमंतराव देसाई, महेश पवार, बाळासाहेब पाटील, विलास कोळेकर, आत्माराम पाटील, रामभाऊ थोरात, मोहन पाटील, अभिजीत पाटील, साहेबराव पाटील, पतंग माने, ॲड. गजानन खुजट यांच्यासह बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.