सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाला छेद देत भरणे यांनी आपले वर्चस्व मिळवले होते, यानंतर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन वेळा कडवी झुंज देत भरणे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास यश आले नाही. इंदापूर तालुक्यातील अन्य सहकारी संस्थांच्या तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील पाटील यांनी भरणे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांच्या आघाडीला साथ देऊन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आव्हान मोडण्याचा प्रयत्न केला, मात्र या अटीतटीच्या लढतीत भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचीच सरशी झाली.
दरम्यान, पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी फारकत घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते शरद पवार गटासोबत सक्रिय आहेत. नुकतीच शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला, हा दाखला देत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासोबत ही निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर करत कन्या अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.
तालुक्याच्या विकासासाठी सिंहाचा वाटा
माझ्यात व दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, तर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघांचेही योगदान आणि सिंहाचा वाटा आहे, असे सांगत राजकारणात वैर नसते, विचारांची लढाई असते असे सांगत या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या नव्या मैत्रीची घोषणा केली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांना दिली, मात्र कृषिमंत्री भरणे व पाटील यांची ही मैत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना कितपत रुचणार?, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
दोन्ही नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न
दरम्यान प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, त्यांनी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या साथीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले, मात्र नुकतेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊन प्रवेश देखील केला. माजी जिल्हा परिषद व बांधकाम समिती सभापती प्रवीण माने व गारटकर हे दोन नेते कृषी मंत्री भरणे व पाटील यांच्या राजकीय मनोमिलनामुळे दुरावणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या भाजपसोबत घेऊन, या दोन्ही नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
एकीकडे कृषिमंत्री भरणे यांनी त्यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व मिळवलेल्या भरणे यांना आप्पासाहेब जगदाळे या दिग्गज नेत्यासह भरणे यांनी आपल्या मुशीत तयार केलेल्या अन्य नेत्यांची मोठी साथ आहे. त्यामुळे पाटील व भरणे यांची मैत्री कितपत यशस्वी होणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.






