सातारा : खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे. अशातच, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. वजीर निघून चालला होता म्हणून पवारांनी राजीनामा दिला, असा दावा महेश शिंदे यांनी केला आहे. ४० आमदार घेऊन वजीर गायब होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार हुशार आहेत. वजीर निघून चालला आहे हे त्यांना कळले होते. राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. ४० आमदारांसह त्यांचा वजीर गायब होणार होता आणि तो होणारही आहे. पक्ष टिकवण्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. राष्ट्रवादी पक्षात धुसफूस आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. एका घरात २ मुख्यमंत्री होणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय, असे सांगत पवारांच्या राजीनाम्यावर आमदार महेश शिंदेंनी खोचक टीका केली आहे. तर, वज्रमुठ सभेच्या तारखा बदलण्यावरुनही महेश शिंदेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ज्या जमिनीवर आपण उभा होतो ती जमीनच आपली नाही, हे उद्धव ठाकरे यांना कळायला लागलं आहे. ती जमीनच विकली गेली अाहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे.
आघाडीची वज्रमुठ होतीच कुठं?
महाविकास आघाडीची वज्रमुठ होतीच कुठं? वज्रमुठ करायला अंगात ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमुठ गायब केलीये. वज्रमुठ टिकवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची बोचरी टीका महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.