
मुंबई : नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कांदा (Onion) खरेदीच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी तसेच अमित शाह आणि पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.”
गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी देखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाली. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळ त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं’
यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे. जेव्ही अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आता या मोठ्या संकटामध्ये देखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी 2410 रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय. राज्य सरकार देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.