
आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर ठाम, एकमत न झाल्यास...; शशिकांत शिंदे यांची भूमिका
जिल्हाध्यक्ष, प्रतिनिधी आणि कोअर कमिटीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण असले तरी अंतिम धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावर घ्यावा लागेल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत एकमताने निर्णय घेण्यात येईल, जिल्हाध्यक्ष व कोअर कमिटीला निर्देश देण्यात आले असून, शनिवारच्या संध्याकाळपर्यंत शिवसेना व काँग्रेससोबत आघाडी बाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवली जाईल, असे शिंदे म्हणाले.
अजित पवार गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, “पहिला आणि प्राधान्याचा पर्याय महाविकास आघाडीच आहे. मात्र, जर आघाडीमध्ये एकमत झाले नाही, तरच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील शहराध्यक्षांनी अजित पवार यांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, आघाडीचा अधिकार जिल्हास्तरावर नाही. हा निर्णय शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि मी स्वतः राज्यस्तरावर घेऊ.
आघाडीसाठी प्रयत्नशील
महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते, त्यामुळे आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. “पदाधिकाऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींचे मत आहे की प्रभाग आणि वार्डरचनेनुसार योग्य निर्णय न घेतल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, एक प्रवाह महाविकास आघाडी सोबत जाण्यास ठाम आहे तर दुसरा अजित पवारांसोबत जाण्यास त्यामुळे आजची जिल्हास्तरीय बैठक ही पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेऊन वरीष्ठांसमोर मांडणे आणि यावर वरीष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेणे असेही त्यांनी स्पष्ट केले.
वस्तुनिष्ठ विचार करुन अंतिम निर्णय
महाविकास आघाडी अंतिम होईपर्यंत कोणतीही उमेदवार यादी जाहीर केली जाणार नाही, असे सांगत शिंदे म्हणाले की, २३ तारखेला आघाडीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्या ठिकाणी संबंधित पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील. प्रभागनिहाय अभ्यास करूनच अंतिम आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडी सोबत गेल्याने फायदा होतो की अजितदादांसोबत, याचा वस्तुनिष्ठ विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.