सातारा : राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली ही योजना अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली. दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची या योजनाचा महायुती सरकारकडून बोलबाला सुरु आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकार जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी आमदार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पहिला हफ्ता खात्यामध्ये येण्यापूर्वीच सत्ताधारी आमदार महिलांकडून पैसे परत घेण्याचे वक्तव्य करत आहेत. विरोधी भूमिका घेतली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत काढून घेऊ अशी भूमिका आमदार घेत असल्यामुळे योजनेवरुन राजकारण सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भाजप आमदार रवी राणांचे विधान
भाजप आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “सरकारने महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला 1500 रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणाऱ्या पैशांवरुन जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे.
आमदार महेश शिंदे यांचे वादग्रस्त विधान
आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. महायुतीच्या नेत्यांनी देखील रवी राणा यांना खडेबोल सुनावत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने देखील याच आशयचे वक्तव्य केले आहे. साताऱ्यातील कोरेगावचे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथील मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले. विरोधात भूमिका घेतली तर योजनेतून नावं वगळण्यात येतील असा इशारा आमदारांनी दिला. आमदार शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. निवडणुकीनंतर डिसेंबरमध्ये या योजनेसाठी तपासणी समितीची बैठक आहे. ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊनही विरोधात काम करतील त्या बैठकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेतून तुमची नावे वगळण्यात येतील, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.