नवी दिल्ली : आग्र्यातील लाल किल्ल्यात (Red Fort) ‘दिवाण-ए-आम’मध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) साजरी केली जाणार आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व शिवप्रेमींना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. याचं वैशिष्ट्य असं की, साडे तीनशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता. तेव्हा औरंगजेबानं त्यांना भेटण्यास नकार दिला होता, अशा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये यावर्षी शिवजयंती साजरी होणार आहे.
दिल्लीमधील ऐतिहासिक आग्रा येथील लाल किल्ल्यात येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली आहे. आग्रा येथील लाल किल्लामधील ‘दिवान-ए-आम’ सभागृहातच यंदा 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.
काय आहे ‘दिवाण-ए-आम’चा इतिहास?
साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र युवराज संभाजी यांना मुघल सम्राट औरंगजेबाने आग्रा किल्ल्यात कैद केले होते. औरंगजेबाने त्यांना मारण्याचा कट रचला होता. मात्र, शिवाजी महाराज येथून सुखरूप निसटले होते. मराठ्यांच्या इतिहासात या घटनेला खूप महत्त्व आहे.
यापूर्वी नाकारली होती परवानगी
यापूर्वी या कार्यक्रमाला पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र, याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय दिला होता.