डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिकेने कचरा गोळा करण्याचा ठेका सुमित कंपनीला दिला आहे. हा ठेका चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे. यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कंपनीच्या संचालक अमित साळूंके याला दारु भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. अशा कंपनीला दिलेला ठेका महापालिकेने त्वरीत रद्द करावा. अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेसह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी वैशाली दरेकर आणि डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की, सुमित कंपनीला कचरा उचलण्याचा ठेका ९ आ’गस्टला देण्यात आला. कंपनीची स्थापना २८ आ’गस्ट रोजी झाली आहे. आधी ठेका दिला. त्यानंतर कंपनीची स्थापना झालेली आहे. ठेका देताना अनियमितता झालेली आहे. त्याची साधी चौकशी देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. ठेका देताना अनियमितता झालेली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. महापालिकेने घनकचरा सेवा शुल्क राज्य सरकारच्या आदेशानुसार नागरीकांकडून वसूल करण्यास केली आहे. नागरीकांवर जास्तीचा घनकचरा शुल्क आकारुन त्यातून जमा झालेला कर हा सुमित कंनपीच्या घशात घालायचा असा सगळा प्रकार सुरु आहे.
सुमित कंपनीला कचरा गोळा करण्याच्या कामापोटी वर्षाला महापालिका ८५ कोटी रुपये मोजणार आहे. या कंपनीने महापालिकेच्या सात प्रभागात कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याठिकाणी ही कचरा उचलण्याच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे नागरीकांकडून करण्यात आलेल्या आहेत. या कंपनीचा ठेका महापालिकेने केला नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा महापालिकेस देण्यात आला आहे.
यासंदर्भात उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महापालिकेने सुमित एल्को प्लास्ट या कंपनीला आ’गस्ट २०२४ मध्ये काम दिले होते. कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात मे २०२५ मध्ये कामाला सुरुवात केली आहे. कंपनीने तीन प्रभाग क्षेत्रात पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात केली आहे. या कामाचेही देयक अद्याप कंपनीला देण्यात आलेेल नाही.