मुंबई : शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक (Wamanrao Mahadik) यांच्या कन्या हेमांगी महाडिक (Hemangi Mahadik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. हेमांगी यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राजकीय नव्हे, तर सामाजिक क्षेत्रात (Social Sector) कार्यरत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
हेमांगी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. तसेच, स्वर्गीय वामनराव महाडिक आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते, त्या कार्यक्रमाची एक आठवण फ्रेम स्वरूपात भेट म्हणून दिली. याप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत असल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. हेमांगी महाडिक यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.