
Shri Kshetra Bhimashankar temple
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. देशभरातून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्याने २०२६ मध्ये भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून मंदिर आणि परिसरात भव्य स्वरूपात विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये दर्शन रांगा, सभामंडप, सुविधा केंद्रे आणि मंदिर परिसराचा समावेश असणार आहे. या विकास कामांचा एक भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शन बारीच्या पायऱ्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिर काही काळ पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अद्याप मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, येत्या आठवडाभरात विकास कामांची पाहणी करण्यासाठी विशेष समिती भीमाशंकर येथे येणार आहे. त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, गुरुवार दि. २५ रोजी ख्रिसमस आणि त्यानंतर नववर्ष सुरू होत असल्याने दर्शनाचा प्लॅन असलेल्या भाविकांनी शक्य असल्यास लवकर दर्शन घेऊन जावे, असेही सूचित केले जात आहे. मंदिर किती कालावधीसाठी बंद राहील. किती तारखेपासून बंद राहणार असल्याचे याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मंदिर विकास कामांसाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडेगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंदिर बंद ठेवण्याची अधिकृत तारीख जिल्हाधिकारी जाहीर करतील. त्यानंतरच प्रत्यक्ष विकास कामांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दिली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.