पिंपरी: “पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दीनाचा सोयरा पांडुरंग” या अभंगाच्या भक्तिरसात न्हालेल्या टाळ-मृदंगाच्या निनादात श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या भक्तिरसात न्हालेल्या वारीने अलंकापुरी (आळंदी) हरिनामाने दुमदुमली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूर दर्शनाच्या उत्साहाची झलक स्पष्ट दिसत होती. काही वारकरी पावसाच्या सरी अंगावर घेत टाळ-मृदंग वाजवत, फेर-फुगड्या खेळत, जयघोष करत आनंदाने नाचत होते.
“ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या गजरात अलंकापुरी भक्तिरसात न्हालेली होती. “तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती, बैसला तोचित्तीं निवडेना” या संत तुकारामांच्या ओळीप्रमाणे, भक्तांच्या मनात पांडुरंगाचीच आस, आणि शरीरात केवळ नामस्मरणाचेच बळ. अशा भक्तीच्या भरात पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान करत आहे.
प्रमुख उपस्थिती
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ, विद्यमान आमदार बाबाजी काळे, आमदार महेश लांडगे, खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार संजय जाधव, जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम. के. महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पावसाच्या साक्षीने पालखी प्रस्थान गुरुवारी रात्री श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीतून प्रस्थान करताना पावसाच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र यामुळे अनेक वारकऱ्यांना पारंपरिक स्नानाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे काहींचा हिरमोड झाला, तरीही हरिनामाचा ओघ खंडित झाला नाही.
प्रस्थानपूर्व जय्यत तयारी पालखी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला टेम्पो, ट्रक आणि पायी प्रवास करत हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले होते. मंदिर परिसरात हार-फुलांची व वारकरी साहित्याची दुकाने सजली होती. मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. “ज्ञानोबा माऊलीचा जयघोष” करत वारकरी समाधी दर्शन घेत होते. काही भाविकांनी महाद्वाराबाहेरच हरिनामाचा जप करत प्रस्थान सोहळा अनुभवला. वारकरी संप्रदायाचा रंगतदार सोहळा टाळ-मृदंगाचा निनाद, विणेचा झंकार आणि जयघोषाच्या लहरीत बेभान झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या, फेर, पारंपरिक खेळ खेळत हरिनामात लीन होऊन नृत्य केले.
मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. ‘हरित वारी’चा पर्यावरणपूरक संदेश पालखी प्रस्थानादिवशी ‘हरित वारी’चे आयोजन करण्यात आले होते. “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “प्लास्टिकमुक्त वारी” असे संदेश देत काही दिंड्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. भाविकांचा उत्साह, मोबाईलमध्ये टिपले क्षण वारीच्या प्रत्येक क्षणात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले, तर अनेकांनी तो क्षण मोबाइलमध्ये कैद केला. वारकऱ्यांबरोबर सेल्फी काढत भक्तिरसात न्हाल्याचे अनेक दृश्ये दिसून आली.