कुडाळ/ रोहन नाईक : इन्सुली घाटात कुडाळ-पणजी एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघाताबाबत तांत्रिकदृष्ट्या एसटी बसचालक दोषी असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ठरवून टाकले असून हे पूर्णता चुकीचे आहे. याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एसटी आगारात धडक देत आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांना चांगलेच धारेवर धरले.
कुडाळ एसटी डेपो येथे महाराष्ट्र एसटी कामगार सेना फलकाचे अनावरण बुधवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नांबाबत त्यांना धारेवर धरले. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. बसचे ब्रेक फेल झालेले नसून बसला एअर ब्रेक आहेत. एअर ब्रेक असलेल्या बसचे ब्रेक फेल होत नाहीत, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याबाबत एसटी कामगार सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी याबाबत रोहित नाईक यांना जाब विचारला.
यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, संतोष शिरसाट, अतुल बंगे, महाराष्ट्र एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, जिल्हा सचिव भगवान धुरी, कुडाळ आगार अध्यक्ष दीपक भोगले, आगार सचिव अमोल परब, एसटी कर्मचारी महेश वेंगुर्लेकर, विजय पारधी, मुकुंद बोगार, तुकाराम शेळके, नीलेश शिरोडकर, दीपक धुरी, दिवाकर वारंग, संतोष धुरी, चारुदत्त मोरे, अजित सावंत, महेंद्र पवार, बाळकृष्ण राठोड, संदीप दुखंडे, एस. एस. वारंग, संदीप रासम आदी चालक-वाहक उपस्थित होते.
एवढा मोठा अपघात होऊन प्रसंगावधन राखून चालकाने आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचविला असतानाही तुम्ही त्याला दोषी कसे ठरवू शकता? पत्रकारांना तुम्ही अधिकाऱ्यांनी चालकाविरोधात स्टेटमेंट दिले आहे. दहा वर्षाच्या गाडीचे ब्रेक फेल होऊ शकत नाही असे तुम्ही कस सांगू शकतात? तुम्ही अपघातस्थळी पहाणी केली, मग तुमचे व्यक्तीगत मत काय आहे ? चालकाचा दोष आहे का? असे अनेक सवाल करीत त्यांनी आगार व्यवस्थापक नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
चालकाने गाडी सुरु असताना गाडीचे ब्रेक लागत नसल्याची कल्पना प्रवाशांना दिली होती. तरीही आपण अधिकारी स्टेटमेंट देता गाडीचे ब्रेक फेल झालेच नाहीत. त्यामुळे हे पूर्णता चुकीचे आहे, असे सांगून आमदार नाईक यांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. रोहीत नाईक म्हणाले, गाडी ही कुडाळ डेपोची होती. घटना समजल्यानंतर आपण त्याठिकाणी पोहोचलो. त्याठिकाणची पाहणी करून चालक-वाहक व प्रवाशांची विचारपूस केली. अपघात हा सावंतवाडी तालुक्यात झाल्यामुळे त्या अपघाताची हाताळणी सावंतवाडी डेपोने केली. त्यावर वैभव नाईक म्हणाले, गाडी आपल्या डेपोची होती ना? मग तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही त्याठिकाणी काहीतरी बोलणे आवश्यक होते. यावरून तुम्ही त्यांना सहमत दर्शवल्याचे दिसून येते. तुम्ही पत्रकारांना दिलेल्या स्टेटमेंटमुळे आरटीओ अहवालात तेच सांगणार आहे, असे सांगून त्यांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली.
गाडीच्या चालकाने हँडब्रेक वापरला नाही. गाडी एअर गेरमध्ये होती, असे रोहित नाईक यांनी सांगितले. त्यावर वैभव नाईक व अनुप नाईक यांनी रोहीत यांना चांगलेच सुनावले. एसटीची प्रतिमा तुम्ही अधिकारीच कर्मचाऱ्यांना वेठीस धरून मलीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना समान न्याय द्या. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे रहा, असे त्यांनी सांगितले. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका, असे वैभव नाईक यांनी सांगितले. आपण याबाबत लवकरच परिवहमंत्री आणि विभाग नियंत्रक यांच्याशी बोलणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच वैभव नाईक यांनी कुडाळ डेपोला येणाऱ्या नवीन गाड्याबाबतही चर्चा केली. कुडाळ डेपोला तुम्ही किती गाड्याची मागणी केली आहे? यावर रोहित नाईक म्हणाले आपण विभाग नियंत्रक यांच्याकडे नवीन दहा एसटी बसेसची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे लांबपल्ल्याच्या गाड्याचीही आमदार नाईक यांनी चौकशी केली.