पारगाव शिंगवे : मला राजकारणातून संपवण्यासाठी काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या न्याय व हितासाठी शेवटपर्यंत लढत राहणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असे माजी सभापती देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे श्री क्षेत्र थापलींग देवस्थान मंदिर येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचाराचा नारळ फोडून व तळीभंडार करून आंबेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या निवडणूक प्रचार सुरुवात करण्यात आली. यावेळी देवदत्त निकम बोलत होते.
निकम म्हणाले की, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चांगल्या स्थिती चालवून अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती ही डिजिटल बाजार समिती बनवून नावलौकिक मिळून दिला आहे. मी काम करत असताना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळून व बाजार समितीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी मी प्रयत्न केलेला होता.
मी स्वच्छ व प्रामाणिकपणे कारभार केला
तसेच शेतकऱ्यांना चाळीस रुपयाला जेवणाची थाळी उपलब्ध करून दिलेली आहे. या अगोदर या बाजार समितीमध्ये जुगाराचा डाव, दारू पिण्याचा अड्डा बनला होता. मी याचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला. बाजार समितीमध्ये स्वच्छताग्रह व शेतीमालांसाठी शेडची उभारली केली. तसेच पाणीपुरवठा यासारखी चांगली कामे केली. मी स्वच्छ व प्रामाणिकपणे कारभार केला. चांगले काम करत असताना मला जाणीवपूर्वक राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होता, असेही निकम यांनी म्हटले आहे.