State Women's Commission takes notice of women journalist threat case in Lonavala
वडगाव मावळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. मात्र पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लोणावळा येथे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईकांना धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर दिले आहेत. त्यांनी महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना या संबंधित आदेश दिले आहेत.
लोणावळा येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके व महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार फेरी दरम्यान दोघांच्या समर्थकांमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन सहकाऱ्यांनी धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात संबंधित महिला पत्रकाराने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्याची गंभीर दखल घेत चाकणकर यांनी पोलीस खात्याला सूचना केल्या आहेत.
हे देखील वाचा : ‘ना बटीए, ना कटीए, मिलकर बीजेपी को रपटीए…’; भाजपच्या घोषणेला आपचे सडतोड उत्तर
महिला पत्रकार धमकी प्रकरणी किशोर भेगडे, संदीप भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तातडीने या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग आणि पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास तातडीने पाठविण्यात यावा अशी सूचना देण्यात आली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील महिलांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. राजकीय नेत्यांनी महिलांबाबत बोलताना, वागताना चुकीचे कृत्य केल्यास त्या विरोधात कडक कारवाई होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे मत स्पष्ट मत रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
लोणावळ्यात नऊ नोव्हेंबरला संध्याकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे समर्थक आमने-सामनेआले. यामुळे लोणावळ्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रकरणाची चुकीची बातमी दिल्याचा आरोप करीत भेगडे यांच्या समर्थकांनी संबंधित महिला पत्रकाराला जाब विचारला व निवडणुकीनंतर बघून घेण्याची धमकी दिली. लोणावळ्यामध्ये 11 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला आडवून धमकावल्याचे फिर्यादीमध्ये सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पत्रकार महिलेने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला. त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश लोणावळा शहर पोलिसांना दिले. तसेच आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे.