
भाजपचे 'मिशन 100+' संकटात; अजित पवारांची 'ही' खेळी ठरतीये अडचणीची
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुणे महानगरपालिका निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असलेल्या भाजपला आता त्यांच्याच मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठे आव्हान भेडसावत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मैदानावरील रणनीती आणि शरद पवार गटाशी पडद्यामागील वाटाघाटींमुळे भाजपच्या छावणीत चिंता निर्माण झाली आहे.
काही खाजगी आणि सरकारी सर्वेक्षणांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळण्यात अपयश आल्याचे दिसून येत असल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वरिष्ठ नेत्यांना फटकारल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी काही भाजप बंडखोरांना त्यांच्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतांच्या वाट्याला फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अनपेक्षित पाऊल भाजपच्या ‘मिशन १००+’ला धोका निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विमानतळावर जात असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील फडणवीसांसोबत एकाच गाडीत प्रवास करत होते. फडणवीस गाडीत चढताच चंद्रकांत पाटील आले. पाटील येताच, फडणवीस यांनी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना हाक मारण्यास सांगितले. आदेश मिळताच, चंद्रकांत पाटील यांनी घाईघाईने मोहोळ यांना बोलावून अण्णा, अण्णा ! असे ओरडले.
विमानतळावर बंद दाराआड दीर्घ चर्चा
यानंतर, तिन्ही नेत्यांनी विमानतळावर बंद दाराआड दीर्घ चर्चा केली. या बैठकीत फडणवीस यांनी पुण्यातील सर्व १६५ जागांचा आढावा घेतला. भाजपची स्थिती कमकुवत असलेल्या किंवा सर्वेक्षणाचे निकाल विरोधात आलेल्या भागात त्यांनी तातडीने रणनीती बदलण्याचे आदेश दिले. त्यांनी स्थानिक नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत बेपर्वा राहू नका असे स्पष्ट सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीबाबत…
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या युतीला स्पष्टपणे नकार दिलेला नाही. यामुळे शक्यतांना वाव मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतेवर अजित पवार यांनी खोचक उत्तर दिले. आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं का? ही म्हण वापरत त्यांनी सध्या असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सूचित केले. सध्या आमचं पूर्ण लक्ष केवळ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर आहे. गेल्या नऊ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का? त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.